अनुवंशिकता, त्वचेतील जनुकीय दोषांमुळे सोरायसिसचा आजार होत असला, तरी नोकरी, वैयक्तिक कारणास्तव वाढणारा ताणतणाव यांमुळेदेखील हा आजार वाढत असल्याचे धक्कादायक निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांनी नोंदविले. विविध कारणांमुळे येणारा ताणतणाव सोरायसिसचा आजार वाढण्यास कारणीभूत असल्याचे एक कारण असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा, व्यायाम करण्याचा सल्लाही त्वचारोग तज्ज्ञांनी दिला.
जागतिक सोरायसिस दिन नुकताच पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर सोरायसिसच्या वाढत्या आजारांच्या कारणांची मीमांसा तज्ज्ञांनी केली आहे. सोरायसिस ही एक रोग प्रतिकारशक्तीच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होते. साधारणतः आपले शरीर दर १० ते ३० दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३ ते ४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात. त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरी सर खवल्यांसारखा स्तर बनतो. या विकाराच्या बाह्य स्वरूपामुळे सामान्यांमध्ये फिरताना किंवा वावरताना नागरिकांवर ताणतणाव अधिक वाढतो. सोरायसिस झालेल्या व्यक्ती अनेकदा ओशाळून जातात किंवा सतत भीड बाळगून असतात. या आजारामुळे त्यांच्या आपल्या मित्रमंडळींशी व कुटुंबीयांशी असलेल्या नात्याचेही नुकसान होते.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धनश्री भिडे म्हणाल्या, ‘सोरायसिस होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामध्ये अनुवंशिकता, त्वचेच्या रचनेतील जनुकीय दोष अशी काही कारणे आहेत. त्यात ताणतणाव हे एक काही कारणांपैकी एक आहे. जनुकीय रचनेनुसार सोरायसिसचा आजार वाढत आहे. रक्तदाबाच्या गोळ्या, किंवा काहींकडून मलमाच्या दुष्परिणाम म्हणून सोरायसिसचा आजार होतो. ताणतणाव हे कारण अज्ञात आहे. सर्वांनाच हा आजार होतो असे नाही. ताणतणावामुळे आजारांत मात्र वाढ होत आहे.’ ‘सोरायसिस हा ताणतणावांशी संबंधित आजार आहे. सोरायसिसच्या रुग्णांपैकी सुमारे ७५ ते ८० रुग्ण आजार बळावल्याने प्रचंड तणावाखाली राहतात. मानसिक ताणतणावामुळे शरीरातील रसायने अधिक प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे त्वचेचा दाह अधिकच वाढतो. अशा ताणतणावाच्या प्रसंगांतून सतत गेल्याने सोरायसिस बळावण्याचे प्रमाणही वाढते. बहुतांश वेळा सोरायसिसमुळे येणाऱ्या ताणतणावाला स्त्रियाच अधिक प्रमाणात बळी पडतात. सोरायसिसचे प्रमाण वाढल्याचा परिणाम म्हणून या रुग्णांमध्ये ताणतणाव वाढण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे,’ अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रद्युम्न वैद्य यांनी दिली.
सोरायसिसमुळे होणारा ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा, व्यायाम, छंद जोपासणे, समुपदेशन यासारख्या उपाय करण्याचा सल्ला डॉ. वैद्य यांनी दिला. ध्यानधारणाही एक उत्तम मार्ग आहे. व्यायामामुळे मन:स्थिती सुधारण्यात मदत करणारे व ऊर्जा देणारे ‘एन्डोमॉर्फिन’ नावाचे रसायन अधिक प्रमाणात तयार होते. व्यायामामुळे अधिक चांगली झोप लागते. ताणतणाव कमी होतो. नियमितपणे व्यायाम करणारी स्त्री ही व्यायाम न करणाऱ्या महिलेच्या तुलनेत सोरायसिसशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकते. सोरायसिस असलेल्या इतर लोकांशी संपर्क साधा. असे केल्याने तुम्हाला एकमेकांचे अनुभव समजू शकतील व त्यामुळे आवश्यक असलेला नैतिक आधार मिळण्यास मदत होईल. सोरायसिस असलेल्या लोकांना बऱ्याचदा एखादा छंद जोपासण्याचा सल्ला दिला जातो, याकडे डॉ. वैद्य यांनी लक्ष वेधले.
ताणतणाव घालविण्यासाठी काय कराल?
– ध्यानधारणा
– व्यायाम
– एखादा छंद जोपासा
– ध्यानधारणा, व्यायामासाठी बाहेरील एखाद्या व्यक्तीची मदत लागली, तर घ्या
– कुटुंबीयांसह इतर ओळखीच्या लोकांचा खंबीर आधार आवश्यक
– जाणकार व्यक्तीकडून समुपदेशन